पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो?

पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो?
पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो? बद्धकोष्ठता म्हणजे काय?

वाचकहो नमस्कार. आपण मागील दोन लेखात अॅसिडिटी संबंधित आजारांचा अभ्यास केला. या लेखात देखील आपण आपल्या जीवनशैलीशी संबंधित एका लक्षणाविषयी जाणून घेऊया ती म्हणजे बद्धकोष्ठता. हा रिफाइंड वस्तूंचा जमाना आहे. खाण्याचे तेल, पीठ या वस्तू रिफाइंड येतात. बेकरीतील मैद्याचे पदार्थ, हॉटेल मधील देखील मैदयाचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. यांत्रिकीकरणामुळे शरीराचे चलनवलन कमी झाले आणि स्थुलता वाढली. या सर्वांमुळे पोट साफ न होण्याचे प्रमाण वाढले. पर्यायाने बद्धकोष्ठता वाढली. साधारणपणे जगातील 30 टक्के लोकांना याचा त्रास होतो.

बद्धकोष्ठता कशाला म्हणतात? पोट साफ न होणे हे बद्धकोष्ठतेचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहे. तसेच शौचास जास्त वेळ बसावे लागणे, शौचास जास्त जोर दयावा लागणे, संडास दगडासारखी कडक होणे, पोट साफ न झाल्यामळे वारंवार शौचास जावे लागणे किवा अनेक दिवस शौचास न होणे ही सर्व बद्धकोष्टतेची लक्षण आहेत. काही लोकांना संडास खाली। अडकल्यासारखे वाटणे आणि बोटाने काढावी लागणे असा देखील त्रास होतो. वरीलपैकी साधारणपणे दोन लक्षणे जरी आपणास त्रास देत असतील तर बदधकोष्ठता आहे असे समजावे. महिलांमध्ये बद्धकोष्ठता अधिक प्रमाणात आढळून येते. तसेच वाढते वय, अशिक्षितपणा, कमी शारीरिक हालचाल, स्थूलता, काही प्रकारच्या औषधांच्या सेवनाने बद्धकोष्ठता वाढीस लागते. त्यामध्ये पॅरासिटामोल, अॅस्पिरिन, कॅल्शियम आणि लोह वाढवणारी औषधे, अॅल्युमिनियम असणारी अॅसिडिटीची औषधे, काही पेन-किलर्स यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.

साधारण शरीर रचना आणि कार्य आपल्या शरीरात विष्ठा तयार करण्याचे काम मोठे आतडे करते. लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात येणारे एक ते दीड लिटर पाणी मोठे आतडे शोषून घेते. पचनानंतर उरलेला अन्नाचा चोथा व शंभर ते दोनशे मिली पाणी त्यापासून मोठे आतडे विष्ठा तयार करते. विष्ठा शरीराच्या बाहेर टाकने हे मोठे आतडे, त्याच्या नसा (नर्व), शरीरातील खालच्या भागातील स्नायू आणि गुदद्वाराच्या ठिकाणी असलेला स्नायूंचा व्हॉल्व यांचे सांघिक कार्य आहे. जेव्हा विष्ठा मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागात येते (रेक्टम), तेव्हा आतड्याचा शेवटचा भाग विष्ठा । गुददवारातून बाहेर ढकलतो. पोटाच्या खालच्या भागातील स्नायू त्यावेळी मोठ्या आतड्याला विष्ठा ढकलण्यास मदत करतात. गुददवाराच्या ठिकाणी असलेला स्नायूंचा व्हॉल्व, (जो एरवी विष्ठा रोखून धरण्यास मदत करतो)

तो ढिला झाला की विष्ठा शरीराबाहेर पडते. या शरीर कार्यामध्ये कुठेही अडथळा आल्यास बद्धकोष्ठता होते.

प्रकार

बद्धकोष्ठतेचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे शरीरातील इतर कोणत्या आजारांमुळे किंवा मोठ्या आतड्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यामुळे होणारी बद्धकोष्ठता म्हणजेच सेकंडरी कॉन्स्टिपेशन. डायबेटिस, थायरॉईडचे आजार, पक्षाघात, पाठीच्या मणक्याला होणारी इजा, औषधांचा वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या आतड्याचा कर्करोग ही सेकंडरी कॉन्स्टिपेशन ची काही महत्त्वाची कारणे आहेत. हल्ली सुरू झालेल्या त्रासांमध्ये ही कारणे शोधणे आवश्यक असते. दुसरा प्रकार म्हणजे याचे कोणतेही कारण सापडत नाही असा म्हणजेच फंक्शनल कॉन्स्टिपेशन. यामध्ये प्रामुख्याने आतड्याची गती मंदावल्याने बद्धकोष्टता होते किंवा गुदद्वाराचा स्नायूंचा व्हॉल्व ढिला होत नसल्याने त्रास होतो. त्यास डीफिकेटरी डिसॉर्डर म्हणतात. हा त्रास रुग्णांना अनेक वर्षे त्रास देतो.

सहन करत राहिल्यास होणारे परिणाम

बद्धकोष्ठता सहन करत राहिल्यास पाईल्स (मूळव्याध) म्हणजेच संडासमध्ये वेदनारहित रक्तस्त्राव होणे, फिशर म्हणजेच संडासमध्ये वेदने सोबत रक्तस्त्राव होणे, संडासच्या जागेवर कोंब येणे असे त्रास होतात. बोटाने विष्ठा काढण्याच्या सवय असेल तर आतड्यास इजा होऊन अल्सर होतात, आणि त्यातून रक्तस्त्राव होतो. कामामध्ये मन न लागणे, सतत पोट भरलेले वाटणे, नैराश्य येणे ही पुढची लक्षणे होत.

उपचार

बद्धकोष्ठतेसाठी असंख्य प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. परंतु जीवनशैलीत बदल न केल्यास त्रास वारंवार होत राहतो. उपचारासाठी कारण जाणणे आवश्यक असते. आपणास असा त्रास होत असल्यास जवळच्या पोट विकार तज्ञांना जरूर दाखवावे.

___डॉक्टर आपल्या शुगर, थायरॉईड अशा रक्ताच्या प्राथमिक तपासणी करून घेतील. कोणतेही कारण सापडत नसल्यास किंवा कर्करोगाची शक्यता वाटत असली, तर कोलोनोस्कोपी करू शकतात. कोलोनोस्कोपी मध्ये संपूर्ण मोठ्या आतड्याची दुर्बिणीदवारे तपासणी करता येते. कर्करोगाची गाठ सापडल्यास बायोप्सी घेऊन तिचे निदान। करता येते. छोटी गाठ असल्यास संपूर्णपणे काढता देखील येते. भूक न लागणे, वजन कमी होणे, संडास मध्ये रक्त येणे किंवा वय 50 पेक्षा अधिक असल्यास आणि बद्धकोष्ठता हल्लीच सुरू झाल्यास कोलोनोस्कोपी लवकरात लवकर करून घ्यावी.

बद्धकोष्ठतेसाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे वेगवेगळ्या प्रकारच्या बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी लागू पडतात. कधीकधी एकापेक्षा अधिक औषधे एकाच रुग्णामध्ये वापरावी लागतात. अधिक तर रुग्णांमध्ये ही औषधे बराच काळ द्यावी लागतात. त्यामुळे त्यांचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत. जीवन शैलीतील बदल हा प्रमुख्याने करावा तर अशी औषधे ही कमीत कमी लागतात किवा अशी जीवनशैली सातत्याने पाळल्यास औषधे बंद देखील होतात. बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी भरपूर पाणी प्यावे. रोज किमान 30 ते 40 मिनिटे बराबर पायी चालावे. यामुळे आतड्यांची साफ होण्याची गती सुधारते. सकाळी पोटभर नाश्ता करण्याची सवय करावी. आहारात फायबर युक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे. फायबर आपल्या शरीरात शोषले जात नाहीत ते पाणी धरून ठेवून विष्ठा बनवण्यास मोठ्या आतड्यास सहाय्य करतात. आहारातून मैदयाचे पदार्थ पूर्णपणे बंद करावीत. शौचास जाण्याची इच्छा झाल्यास लगेच जावे अडवून ठेवू नये. शक्यतो भारतीय संडासचा वापर करावा. तसे करणे शक्य नसल्यास वेस्टन कमोड वर बसताना पायाखाली किमान सहा इंचाचा स्टूल ठेवावा. ही सर्व जीवनशैली पाळल्यास बराच फरक पडू शकतो

वरील सर्व करून काहीही फरक न पडल्यास अनोरेक्टल मॅनोमेत्री हा तपास करून डीफिकेटरी डिसॉर्डर आहे का हे पहावे. असा त्रास असल्यास रुग्णांना पोटाच्या खालच्या भागातील स्नायूचे व्यायाम करावे लागतात. औषधांनी फारसा फरक पडत नाही.

डॉ. विनीत कहाळेकर

एम डी, डी एम गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (के ई एम रुग्णालय मुंबई)

निरामय लिव्हर गॅस्ट्रो क्लीनिक, समर्थ नगर, औरंगाबाद

यूनाइटेड सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद फोन नंबर ७४९९७०८६३६