फॅटी लिव्हर झाले आहे? नॅश (NASH) म्हणजे काय?

फॅटी लिव्हर झाले आहे? नॅश (NASH) म्हणजे काय?
आज पाचवा जागतिक NASH दिवस. दरवर्षी जून महिन्यातील दुसरा रविवार हा International NASH day म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.
आहारातील बदलामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे भारतात यकृत म्हणजेच लिव्हरशी संबंधित आजारांचे प्रमाण खूप वाढत आहे. लिव्हरचे आजार हे मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या पहिल्या दहा आजारांमध्ये येतात. फॅटी लिव्हरचे वाढते प्रमाण हे लोकांमध्ये काळजीचे कारण बनत आहे.
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा असा आजार आहे ज्यामध्ये मद्यपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर मुळे होणाऱ्या सर्व आजारांचा समावेश होतो. वाढत्या तीव्रतेनुसार तीन आजार मानले जातात – नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFL), नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (NASH) आणि लक्षणीय अल्कोहोल सेवन (<20 g/day स्त्रियांसाठी आणि <30 g/day पुरुषांसाठी) नसतानाही चरबी जमा झाल्यामुळे होणारा NASH सिरोसिस. यकृतामध्ये ≥5% चरबीची (फॅट) उपस्थितीला फॅटी लिव्हर (NAFL) असे म्हणतात, तर चरबी आणि सूज (inflammation) असल्यास नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (NASH) म्हणतात. स्टीटोसिस किंवा स्टीटोहेपेटायटीससोबत सिरोसिस असल्यास NASH सिरोसिस म्हणतात.

NAFLD आणि NASH लोकांमध्ये किती प्रमाणात आढळतात ?
सोनोग्राफी सारख्या इमेजिंगद्वारे निदान केलेल्या NAFLD चा एकंदर जागतिक प्रसार सुमारे 25% व्यक्तींमध्ये आढळतो, तर NASH चा प्रसार 1.5 ते 6.5% आहे. भारतात लठ्ठ आणि मधुमेहाच्या 9-32% रूग्णांमध्ये NAFLD आढळतो.

कुणामध्ये फॅटी लिव्हर आढळते?
लठ्ठपणा, मधुमेह, डिस्लिपिडेमिया, हायपोथायरॉईडीझम आणि पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असणार्‍या रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर सापडते. विल्सन्स रोग, क्रॉनिक हिपॅटायटीस सी, सेलियाक रोग हे देखील शास्त्रीयदृष्ट्या फॅटी लिव्हरसाठी कारणीभूत आहेत. कॉर्टिकोस्टिरॉईड्स, एमिओडारोन, टॅमॉक्सिफेन, इस्ट्रोजेन आणि व्हॅलप्रोएट यांसारखी फॅटी लिव्हरशी संबंधित काही औषधे आहेत.

फॅटी लिव्हरची लक्षणे काय आहेत?
फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांमध्ये सहसा काहीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु 1/3 रुग्णांना अस्वस्थता किंवा थकवा जाणवतो. यकृताच्या वाढलेल्या आकारामुळे त्याचे आवरण (लिवर कॅप्सुल) ताणले जाऊ शकते आणि पोटाच्या उजव्या वरच्या चतुर्थांश भागात वेदना होऊ शकते. NASH सिरोसिस झालेल्या रुग्णांमध्ये सिरोसिसची सर्व लक्षणे आढळू शकतात जसे की, डोळे आणि लघवी पिवळी होणे (कावीळ), पोटात पाणी होऊन पोट फुगणे, पायावर सूज येणे, रक्ताच्या उलट्या होणे किवा काळी संडास होणे, वागण्यातले बदल, इत्यादि. सिरोसिस असलेल्या रूग्णांमध्ये यकृत पेशी निकामी होण्याची चिन्हे असू शकतात.

फॅटी लिव्हरचे निदान कसे करावे?
फॅटी लिव्हर हे सहसा पोटाच्या सोनोग्राफी वर दिसते आणि नियमित आरोग्य तपासणीत त्याचे निदान केले जाऊ शकते. डॉक्टर आपली लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) करतील ज्यामध्ये ट्रान्सअमिनायटिस (AST/ALT यांचे प्रमाण वाढलेले) असल्यास पुढील तपासणी होते. NAFLD च्या जवळजवळ 25% ते 33% रुग्णांना निदानाच्या वेळी प्रगत (advanced) फायब्रोसिस किंवा सिरोसिस असतो. वैद्यकीयदृष्ट्या >50% मध्ये मध्यवर्ती लठ्ठपणा (central obesity) हे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे
NASH असताना LFT मध्ये AST/ALT गुणोत्तर <1 आणि ALT वाढलेले दिसून येते, परंतु जसे रोग फायब्रोसिस / सिरॉसिसमध्ये वाढतो ते प्रमाण उलट होते. सिरॉसिस सह NASH असतांनाही सुमारे 80% रुग्णांमध्ये ALT पातळी नॉर्मल दिसून येते. म्हणून NAFLD च्या निश्चित निदानासाठी, लिव्हर बायोप्सी (लिव्हरचा छोटा तुकडा घेणे) हे सुवर्ण मानक (सर्वात महत्वाची टेस्ट) आहे. फॅटी लिव्हरचे मूल्यांकन आता नियमितपणे फायब्रोस्कन द्वारे केले जाते, जे चरबी आणि फायब्रोसिसचे मूल्यांकन करते.

सर्व फॅटी यकृत उपचार केले पाहिजे का?
लक्षणीय फायब्रोसिस (≥F2) असलेल्या NASH रुग्णांसाठी कोणतीही औषधी प्रमाणित नाही. 800 IU/दिवसाच्या दैनंदिन डोसमध्ये व्हिटॅमिन ई NASH सह मधुमेह नसलेल्या व्यक्तींमध्ये यकृताची सूज (inflammation) सुधारते. पायोग्लिटाझोन नावाची औषधी NASH सह मधुमेह असलेल्या आणि नसलेल्या रूग्णांमध्ये यकृताची सूज सुधारते परंतु साइड एफेक्ट्स मुळे फारशी वापरली जात नाही. थेरपी सुरू करण्यापूर्वी रुग्णाला जोखीम आणि फायदे समजावून सांगितल्यानंतर याचा वापर केला जाऊ शकतो. अनेक नवीन औषधे बाजारात येत आहेत, परंतु त्यापैकी अद्याप कोणतीही प्रमाणित केलेली नाहीत. NAFLDच्या उपचारात आहार, व्यायाम आणि लठ्ठपणा, डिस्लिपिडेमिया, हायपोथायरॉईडीझम आणि मधुमेह यासारख्या संबंधित आजारांचे एकाचवेळी उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णाने निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास निश्चितच त्रास कमी होण्यास मदत होईल.

रुग्णांनी आहारात काय खावे?
हे सर्वज्ञात आहे की 500 ते 1000 kcal कॅलरीची कमतरतेने दर दिवशी 0.5 ते 1 किलो/आठवडा वजन कमी होते. शरीराच्या वजनाच्या 5% वजन कमी केल्याने यकृताचा स्टेटोसिस सुधारतो, तर >7% शरीराचे वजन कमी केल्याने स्टीटोसिस आणि सूज inflammation) मध्ये सुधारणा होते.
रुग्णांना फ्रक्टोज युक्त पेये/अन्न टाळण्याचा आणि अल्कोहोल न घेण्याचा सल्ला दिला पाहिजे. लाल मांस (रेड मीट) प्रतिबंधित आहे. मासे आणि पोल्ट्री सुरक्षित आहेत.
भाज्या, फळे, धान्य, शेंगा भरपूर प्रमाणात घेऊ शकता. कॉफीमुळे फायब्रोसिस/स्टीटोहेपेटायटीस कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
यकृतावरील चरबी कमी करण्यासाठी मध्यम तीव्रतेची एरोबिक व्यायाम (150-200 मिनिटे/आठवडा वेगाने चालणे किंवा सायकल चालवणे) खूप प्रभावी आहे. कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल किंवा मागील पातळीपेक्षा शारीरिक क्रियेमध्ये वाढ करणे हे सतत निष्क्रिय राहण्यापेक्षा चांगले आहे. कमी कॅलरी असणार्‍या आहारासह मध्यम-तीव्रतेचा व्यायाम (500-1,000 kcal कमी/दिवस) वजन आणि यकृतातील चरबी कमी होण्याची सर्वोत्तम शक्यता प्रदान करतो.

डॉ. विनीत कहाळेकर
लिव्हर विकार, पोट विकार आणि एंडोस्कोपी तज्ञ
युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद
निरामय लिव्हर क्लिनिक, औरंगाबाद
७४९९७०८६३६
#fattyliverinmarathi #NASH #Internationalnashday