पोट फुगतय का? गच्च होतय का?

पोट फुगतय का? गच्च होतय का?…..

डीस्पेप्सिया (अपचन) म्हणजे काय?

वाचकहो नमस्कार! मागील लेखात आपण ऍसिडिटीचे ढोबळ मानाने तीन प्रकार कोणते आहेत ते जाणून घेतले आणि त्यातील GERD म्हणजे काय हे पाहिले. या लेखात आपण डीस्पेप्सिया अर्थात अपचन म्हणजे काय हे बघूया.

अंदाजे 30 ते 50 टक्के जनतेला अपचनाचा त्रास होतो. हा त्रास आपले जठर आणि लहान आतडे यांच्या कार्याशी संबंधित आहे.

साधारण शरीर रचना आणि कार्य

मागील लेखात आपण पाहिले, आपले खाल्लेले अन्न हे अन्ननलिकेतून पोटातील जठरामध्ये जाते. उपाशी पोटी असताना हे जठर एखाद्या छोट्या स्नायूंच्या पाऊच प्रमाणे आकंचन पावलेले असते. जेवताना आपले अन्न जठरात येण्यास सुरुवात झाल्यानंतर ते हळूहळू प्रसरण पावते. जठरातील स्नायूंची प्रसरण पावण्याची एक विशिष्ट क्षमता असते. सर्वाधिक क्षमतेने प्रसरण पावल्या नंतर आपल्याला पोट भरल्याची जाणीव होते. पोट भरल्यानंतर जठरामध्ये अन्नपचन होते आणि हे पचलेले अन्न अन्नघटक शोषून घेण्यासाठी लहान आतड्यामध्ये पाठविले जाते. हे पचलेले अन्न जठरामधून लहान आतड्यामध्ये पाठवण्याची एक विशिष्ट गती असते आणि यास लागणार्या वेळास ‘गॅस्ट्रिक एमटींग टाइम’ असे म्हणतात.

अपचनाची लक्षणे काय?

पचनाच्या प्रमुख लक्षणांमध्ये जेवल्यानंतर पोट फुगणे, पोट सतत गच्च राहणे, थोडसे खाल्ले की पोट भरणे, नाभीच्या वरील पोटात दुखणे किंवा आग होणे यांचा समावेश होतो. याशिवाय मळमळ, उलट्या, सतत ढेकर येणे, पोटात गुडगुड होणे ही लक्षणे देखील दिसून येतात. काही लोकांमध्ये वजन कमी देखील होते. काही रुग्णांमध्ये पोटात त्रास होतोय पण काय होतंय हे सांगता येत नाही. अशा वेळी देखील अपचनाचे निदान करता येते.

40 ते 50 टक्के लोकांच्या अपचनाचे कारण GERD असते. त्यामुळे अशा लोकांना छातीत जळजळ, मळमळ व घशात आंबट कडू पाणी येणे असा त्रास देखील होतो.

दहा टक्के लोकांना पेप्टिक अल्सरचा त्रास असतो. एक टक्के लोकांना कर्करोगासारखा गंभीर आजार असू शकतो. जठर, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय किंवा किडनी या अवयवांना होणाऱ्या आजारांमुळे देखील अपचन हा त्रास होऊ शकतो. डायबेटिस, थायरॉईड अशा किंवा शरीरातील इतर ग्रंथींच्या आजारांमुळे देखील हा त्रास होऊ शकतो. अनेक औषधांच्या सेवनाने हा त्रास होतो. त्यामध्ये पेन-किलर्स, हिमोग्लोबिन वाढवणारी औषधे, आणि स्टेरॉइड्स यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. मद्यपान हे या त्रासाचे खूप महत्त्वाचे कारण आहे. अनेकदा खूप तपास करून देखील कोणत्याही कारण सापडत नाही. अशावेळी त्यास ‘फंक्शनल डीस्पेप्सिया’ असे म्हणतात

असा त्रास का होतो?

वरील सर्व कारणांमुळे आपले जठर लहान आतडे यांना इजा होऊन त्यांच्या कार्यात अडथळे येतात. 20 ते 50 टक्के लोकांमध्ये जठराची पचलेले अन्नघटक आतड्यात पाठवण्याची गती मंदावते (delayed gastric emptying). अंदाजे 40 टक्के लोकांमध्ये जठराची प्रसरण पावण्याची क्षमता कमी होते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या

मानसिक इच्छेनुसार ठराविक जेवण्याची सवय असते. हेच जेवण क्षमता कमी झालेल्या जठरासाठी अधिक ठरते. त्यामुळे जठर आणि परिणामी पोट फुगल्यासारखे किंवा गच्च झाल्यासारखे वाटते. काही लोकांमध्ये हेलिकॉबॅक्टर पायलोरी नावाचा बॅक्टेरिया जठराला जंतुसंसर्ग करतो. हा बॅक्टेरिया जठराच्या आतील आवरणाखाली राहन असिडचा स्त्राव वाढवतो आणि जठरास इजा करतो. ही अपचनाची काही प्रमुख कारणे आहेत. याशिवाय इतरही काही कमी महत्वाची कारणे आहेत. अनेक रुग्णांमध्ये त्रास हा GERD किंवा बद्धकोष्ठते सोबत आढळून येतो.

उपचार

हा त्रास कोणासही उदभव शकतो आणि कोणत्याही वयात होऊ शकतो.. त्रास झाल्यास आपल्या जवळच्या पोट विकार तज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर आपल्या प्रमख आजारांसाठीच्या तपासण्या करून घेऊ शकतात, जसे की लिवर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, रक्तातील साखरेचे प्रमाण, थायरॉईड टेस्ट, पोटाची सोनोग्राफी, इत्यादी. यामध्ये काहीही न आढळल्यास डॉक्टर आपली गॅस्ट्रोस्कोपी करू शकतात. गॅस्ट्रोस्कोपी मध्ये । अन्ननलिकेचे जठराचे किंवा लहान आतड्याचे आजार सापडतात. तसेच हेलिकॉबॅक्टर पायलोरी बॅक्टेरियाची तपासणी देखील करता येते. ज्या लोकांना भूक न लागणे, वजन कमी होणे, सतत उलट्या, पोटात गाठ, अशी धोक्याची लक्षणे आढळतात त्यांनी आपली गॅस्ट्रोस्कोपी लवकर करून घ्यावी. गॅस्ट्रोस्कोपी मध्ये कर्करोगाचे निदान प्रभावीपणे करता येते.

डीस्पेप्सिया किंवा अपचन या त्रासाचे उपचार त्याच्या कारणावरून करावे लागतात. मुख्यत्वे लोकांना GERD, पेप्टिक अल्सर किंवा त्यासंबंधी चे आजार झाल्यामुळे हा त्रास होतो. त्यांना प्रोटॉन पंप इंहिबिटार (पॅटोप्राझोल, राबेप्राझोल आणि तत्सम औषधे) हे प्रभावी औषधी उपलब्ध आहेत. तसेच त्यांना GERD साठी लागणारी पथ्ये पाळावी लागतात (मागील लेख पहावा). ज्या रुग्णांची जठराची गती मंदावली आहे त्यांना प्रोकायनेटिक प्रकारची औषधे (domperidom, itopride या प्रकारची) बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो. जठराची प्रसरण पावण्याची क्षमता वाढवणारी औषधे देखील (Acotiamide) उपलब्ध आहेत. त्यामुळे अपचनाचा अतिशय चांगल्या प्रकारे उपचार होऊ शकतो.

डॉ. विनीत कहाळेकर एमडी,

डीएम गॅस्त्रोएंटेरोलोजी पोट विकार आणि एन्डोस्कोपी तज्ञ