लिव्हर (यकृत) खराब होतंय? लिव्हर सिरॉसिस म्हणजे काय? ( भाग 1)

वाचकहो नमस्कार! आजकालच्या जीवनात लिव्हरचे आजार खूप कॉमन झाले आहेत. एखादा रुग्ण कावीळ पोटात पाणी पायावर सूज असा त्रास देऊन डॉक्टरांकडे गेला की त्याला लिव्हर खराब आहे असे सांगण्यात येते. तर लिवर खराब होणे म्हणजेच सिरॉसिस होणे म्हणजे काय आणि त्याची काय कारणे आहेत त्यासाठी काय करावे याची कारणमिमांसा आपण या लेखात करणार आहोत.

लिव्हरचे शरीरातील कार्य
लिव्हर हा शरीरातील एक सर्वात मोठा अवयव आहे. एखाद्या प्रौढ पुरुषांमध्ये त्याचे वजन साधारणपणे दीड किलोपर्यंत असते. पोर्टल व्हेन नावाची रक्तवाहिनी छोट्या आतडे (small intestine), मोठे आतडे(large intestine), पांथरी (spleen) यांच्याकडून रक्त गोळा करून लिव्हरला रक्तपुरवठा करते. हे रक्त लिव्हरमध्ये अन्नघटक शोषल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया होऊन हृदयाकडे पाठवले जाते. हे सर्व कार्य लिव्हरमधील वेगवेगळ्या पेशी करतात.

लिव्हर खराब होते म्हणजे काय?
आपल्या जीवनातील काही गोष्टी या लिव्हर साठी खूप घातक आहेत, उदाहरणार्थ, मद्यपान, लिव्हरला इजा पोहोचवणारे काही विशिष्ट वायरस (हेपेटाइटिस बी व सी), डायबेटिस, स्थूलता, पेन किलर चे अतिसेवन (NSAIDs), लिव्हरला इजा पोहोचवणाऱ्या औषधींचे दीर्घकाळ सेवन, शरीरामध्ये जन्मजात असलेले जनुकीय आजार या आणि अशा इतर अनेक गोष्टी लिव्हर मधील पेशींना दीर्घकाळ त्रास देत असतात. हा काळा अनेक वर्षांचा असतो. वरील कोणत्याही त्रासामुळे लिव्हर मधील पेशी हळूहळू नष्ट व्हायला लागतात. एका मर्यादेच्या वर ही इजा पोहोचल्यास लिव्हर मधील नष्ट होणाऱ्या पेशींची जागा तंतुमय घटक (fibrous bands) घ्यायला लागतात. अजून तरी ही मर्यादा ओळखणे वैद्यकीय विज्ञानाला शक्य झालेले नाही. आपल्या शरीरावरील जखम बरी होते त्यावेळी ती आकुंचन पावते आणि तंतुमय घटकांमुळे तिथे एक व्रण तयार होतो. लिव्हर मध्ये देखील असेच होते. लिव्हर मधील काम करणाऱ्या पेशी कमी होत जातात , लिव्हर आकुंचन पावते आणि कडक होते. जोपर्यंत 90% लिव्हरला इजा होत नाही तोपर्यंत शक्यतो लक्षणे दिसून येत नाहीत.

लिव्हर सिरोसिस ची लक्षणे काय?
सिरॉसिस कोणत्याही कारणामुळे झाला तरी लक्षणे सारखीच दिसतात. कावीळ म्हणजे डोळे पिवळे होणे, लघवी पिवळी होणे शरीर पिवळे पडणे हे सिरॉसिसचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. लिव्हरला होणारा आघात जोरात असल्यास कावीळ दिसून येतो. परंतु जर आघात हळू हळू होत असेल, तर अनेक रुग्णांमध्ये कावीळ न होता देखील सिरॉसीस होऊ शकतो. खूप थकवा येणे, भूक न लागणे, अचानक वजन कमी होऊ लागणे ही सिरॉसिसची प्राथमिक लक्षणे आहेत. पोटात पाणी होऊन पोट फुगणे, पायावर सूज येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, हात व पाय बारीक होऊन पोटाचा घेर वाढणे सिरॉसिसच्या पुढच्या स्टेजची काही लक्षणे आहेत. तसेच रक्ताच्या उलट्या होणे काळी संडास होणे या गोष्टी दिसून येतात.
सिरॉसिसच्या शेवटच्या स्टेजमध्ये इतर अवयवांवर देखील परिणाम दिसून येतात. शरीरात अमोनिया जास्त झाल्यामुळे मेंदूला सूज येते. अशावेळी झोप कमी जास्त होण्यापासून ते बेशुद्ध होणे तसेच कोमात जाण्यापर्यंत लक्षणे दिसून येतात. किडनीला होणारा रक्तपुरवठा कमी होऊन किडणीला इजा होते.
हृदयाची आकुंचन पावण्याची क्षमता कमी होऊ शकते. फुफ्फुसांचे ऑक्सिजन शोषण्याची क्षमता कमी होऊ शकते. यातील कोणत्याही अवयवांवरील परिणामांमुळे आयुष्य खूप कमी होऊन जाते.

पुढील लेखामध्ये आपण लिव्हर सिरॉसिस च्या प्रमुख कारणांची थोडी माहिती, लागणाऱ्या तपासण्या आणि प्रमुख उपचार यांची माहिती घेऊया.
धन्यवाद.

डॉ. विनीत कहाळेकर
MBBS, MD, DM Gastroenterology (KEM, Mumbai)
लिव्हर विकार, पोट विकार आणि एंडोस्कोपी तज्ञ
निरामय लिव्हर व गॅस्ट्रो क्लिनिक आणि एंडोस्कोपी सेंटर, समर्थ नगर औरंगाबाद
युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद
मोबाईल नं . ७४९९७०८६३६