फॅटी लिव्हर झाले आहे? नॅश (NASH) म्हणजे काय?

फॅटी लिव्हर झाले आहे? नॅश (NASH) म्हणजे काय?
आज पाचवा जागतिक NASH दिवस. दरवर्षी जून महिन्यातील दुसरा रविवार हा International NASH day म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.
आहारातील बदलामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे भारतात यकृत म्हणजेच लिव्हरशी संबंधित आजारांचे प्रमाण खूप वाढत आहे. लिव्हरचे आजार हे मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या पहिल्या दहा आजारांमध्ये येतात. फॅटी लिव्हरचे वाढते प्रमाण हे लोकांमध्ये काळजीचे कारण बनत आहे.
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा असा आजार आहे ज्यामध्ये मद्यपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर मुळे होणाऱ्या सर्व आजारांचा समावेश होतो. वाढत्या तीव्रतेनुसार तीन आजार मानले जातात – नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFL), नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (NASH) आणि लक्षणीय अल्कोहोल सेवन (<20 g/day स्त्रियांसाठी आणि <30 g/day पुरुषांसाठी) नसतानाही चरबी जमा झाल्यामुळे होणारा NASH सिरोसिस. यकृतामध्ये ≥5% चरबीची (फॅट) उपस्थितीला फॅटी लिव्हर (NAFL) असे म्हणतात, तर चरबी आणि सूज (inflammation) असल्यास नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (NASH) म्हणतात. स्टीटोसिस किंवा स्टीटोहेपेटायटीससोबत सिरोसिस असल्यास NASH सिरोसिस म्हणतात.

NAFLD आणि NASH लोकांमध्ये किती प्रमाणात आढळतात ?
सोनोग्राफी सारख्या इमेजिंगद्वारे निदान केलेल्या NAFLD चा एकंदर जागतिक प्रसार सुमारे 25% व्यक्तींमध्ये आढळतो, तर NASH चा प्रसार 1.5 ते 6.5% आहे. भारतात लठ्ठ आणि मधुमेहाच्या 9-32% रूग्णांमध्ये NAFLD आढळतो.

कुणामध्ये फॅटी लिव्हर आढळते?
लठ्ठपणा, मधुमेह, डिस्लिपिडेमिया, हायपोथायरॉईडीझम आणि पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असणार्‍या रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर सापडते. विल्सन्स रोग, क्रॉनिक हिपॅटायटीस सी, सेलियाक रोग हे देखील शास्त्रीयदृष्ट्या फॅटी लिव्हरसाठी कारणीभूत आहेत. कॉर्टिकोस्टिरॉईड्स, एमिओडारोन, टॅमॉक्सिफेन, इस्ट्रोजेन आणि व्हॅलप्रोएट यांसारखी फॅटी लिव्हरशी संबंधित काही औषधे आहेत.

फॅटी लिव्हरची लक्षणे काय आहेत?
फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांमध्ये सहसा काहीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु 1/3 रुग्णांना अस्वस्थता किंवा थकवा जाणवतो. यकृताच्या वाढलेल्या आकारामुळे त्याचे आवरण (लिवर कॅप्सुल) ताणले जाऊ शकते आणि पोटाच्या उजव्या वरच्या चतुर्थांश भागात वेदना होऊ शकते. NASH सिरोसिस झालेल्या रुग्णांमध्ये सिरोसिसची सर्व लक्षणे आढळू शकतात जसे की, डोळे आणि लघवी पिवळी होणे (कावीळ), पोटात पाणी होऊन पोट फुगणे, पायावर सूज येणे, रक्ताच्या उलट्या होणे किवा काळी संडास होणे, वागण्यातले बदल, इत्यादि. सिरोसिस असलेल्या रूग्णांमध्ये यकृत पेशी निकामी होण्याची चिन्हे असू शकतात.

फॅटी लिव्हरचे निदान कसे करावे?
फॅटी लिव्हर हे सहसा पोटाच्या सोनोग्राफी वर दिसते आणि नियमित आरोग्य तपासणीत त्याचे निदान केले जाऊ शकते. डॉक्टर आपली लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) करतील ज्यामध्ये ट्रान्सअमिनायटिस (AST/ALT यांचे प्रमाण वाढलेले) असल्यास पुढील तपासणी होते. NAFLD च्या जवळजवळ 25% ते 33% रुग्णांना निदानाच्या वेळी प्रगत (advanced) फायब्रोसिस किंवा सिरोसिस असतो. वैद्यकीयदृष्ट्या >50% मध्ये मध्यवर्ती लठ्ठपणा (central obesity) हे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे
NASH असताना LFT मध्ये AST/ALT गुणोत्तर <1 आणि ALT वाढलेले दिसून येते, परंतु जसे रोग फायब्रोसिस / सिरॉसिसमध्ये वाढतो ते प्रमाण उलट होते. सिरॉसिस सह NASH असतांनाही सुमारे 80% रुग्णांमध्ये ALT पातळी नॉर्मल दिसून येते. म्हणून NAFLD च्या निश्चित निदानासाठी, लिव्हर बायोप्सी (लिव्हरचा छोटा तुकडा घेणे) हे सुवर्ण मानक (सर्वात महत्वाची टेस्ट) आहे. फॅटी लिव्हरचे मूल्यांकन आता नियमितपणे फायब्रोस्कन द्वारे केले जाते, जे चरबी आणि फायब्रोसिसचे मूल्यांकन करते.

सर्व फॅटी यकृत उपचार केले पाहिजे का?
लक्षणीय फायब्रोसिस (≥F2) असलेल्या NASH रुग्णांसाठी कोणतीही औषधी प्रमाणित नाही. 800 IU/दिवसाच्या दैनंदिन डोसमध्ये व्हिटॅमिन ई NASH सह मधुमेह नसलेल्या व्यक्तींमध्ये यकृताची सूज (inflammation) सुधारते. पायोग्लिटाझोन नावाची औषधी NASH सह मधुमेह असलेल्या आणि नसलेल्या रूग्णांमध्ये यकृताची सूज सुधारते परंतु साइड एफेक्ट्स मुळे फारशी वापरली जात नाही. थेरपी सुरू करण्यापूर्वी रुग्णाला जोखीम आणि फायदे समजावून सांगितल्यानंतर याचा वापर केला जाऊ शकतो. अनेक नवीन औषधे बाजारात येत आहेत, परंतु त्यापैकी अद्याप कोणतीही प्रमाणित केलेली नाहीत. NAFLDच्या उपचारात आहार, व्यायाम आणि लठ्ठपणा, डिस्लिपिडेमिया, हायपोथायरॉईडीझम आणि मधुमेह यासारख्या संबंधित आजारांचे एकाचवेळी उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णाने निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास निश्चितच त्रास कमी होण्यास मदत होईल.

रुग्णांनी आहारात काय खावे?
हे सर्वज्ञात आहे की 500 ते 1000 kcal कॅलरीची कमतरतेने दर दिवशी 0.5 ते 1 किलो/आठवडा वजन कमी होते. शरीराच्या वजनाच्या 5% वजन कमी केल्याने यकृताचा स्टेटोसिस सुधारतो, तर >7% शरीराचे वजन कमी केल्याने स्टीटोसिस आणि सूज inflammation) मध्ये सुधारणा होते.
रुग्णांना फ्रक्टोज युक्त पेये/अन्न टाळण्याचा आणि अल्कोहोल न घेण्याचा सल्ला दिला पाहिजे. लाल मांस (रेड मीट) प्रतिबंधित आहे. मासे आणि पोल्ट्री सुरक्षित आहेत.
भाज्या, फळे, धान्य, शेंगा भरपूर प्रमाणात घेऊ शकता. कॉफीमुळे फायब्रोसिस/स्टीटोहेपेटायटीस कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
यकृतावरील चरबी कमी करण्यासाठी मध्यम तीव्रतेची एरोबिक व्यायाम (150-200 मिनिटे/आठवडा वेगाने चालणे किंवा सायकल चालवणे) खूप प्रभावी आहे. कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल किंवा मागील पातळीपेक्षा शारीरिक क्रियेमध्ये वाढ करणे हे सतत निष्क्रिय राहण्यापेक्षा चांगले आहे. कमी कॅलरी असणार्‍या आहारासह मध्यम-तीव्रतेचा व्यायाम (500-1,000 kcal कमी/दिवस) वजन आणि यकृतातील चरबी कमी होण्याची सर्वोत्तम शक्यता प्रदान करतो.

डॉ. विनीत कहाळेकर
लिव्हर विकार, पोट विकार आणि एंडोस्कोपी तज्ञ
युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद
निरामय लिव्हर क्लिनिक, औरंगाबाद
७४९९७०८६३६
#fattyliverinmarathi #NASH #Internationalnashday

हिपॅटायटिस बी

हिपॅटायटिस बी
HBsAg पॉझिटिव आहे? हिपॅटायटिस बी झालाय? आपण हिपॅटायटिस बी पासून सुरक्षित आहात का ?

मित्रांनो, या कोरोना व्हायरस ने आपणा सर्वांना चागलाच धडा शिकवला आहे. आपल्या आरोग्य संस्थेचे संपूर्ण वाभाडे निघाले आहे. Prevention is better than cure म्हणजे ‘उपचारापेक्षा आजार होऊ न देणे’ हेच उत्तम हे तर आपणास माहीतच आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ असे मानणाऱ्या आपल्या देशात आजार झाल्यानंतर तर तो टोकाची भूमिका घेईपर्यंत अंगावर काढणे हे आपल्या शरीरात मुरलेले आहे. अशाच एका जंतुसंसर्गाने संपूर्णपणे टाळण्यासारख्या या आजाराबद्दल मी आपणास माहिती देणार आहे.

2010 मधील एका अंदाजानुसार जगातील 2480 लाख लोक हिपॅटायटिस बी ने संक्रमित आहे. त्यामधील 15 ते 40 टक्के लोकांना लिव्हरचा सिरॉसिस होणे, लिव्हर निकामी होणे, लिव्हर चा कर्करोग होणे यासारखे आजार होतात आणि यामुळे सहा ते बारा लोक दरवर्षी या जगात मृत्युमुखी पडत असतात. आहे की नाही कोरोना सारखेच भयावह पण मित्रांनो आनंदाची गोष्ट ही आहे की हजार संपूर्णपणे टाळण्या सारखा आहे तेही फक्त छोट्याश्या लसीने.

हेपेटाइटिस बी चे लक्षणे काय?

हिपॅटायटिस बी हा एक असाच विषाणू (व्हायरस) आहे जो आपल्या लिव्हरला (यकृत) संसर्ग करतो. “डॉक्टर मला परदेशी जायचे आहे पण माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे मला जाता येत नाही” असे डॉक्टरांना सांगणारे बरेच रुग्ण भेटतात. ही रुग्ण गरोदर असताना पॉझिटिव्ह येतात तर काही कोणत्या सर्जरी पूर्वी पॉझिटिव्ह येतात. अनेक जण मात्र लिवर सिरॉसिस झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांसाठी डॉक्टरांकडे येतात

लिवर मधील पेशींना संसर्ग केल्यानंतर आपल्या रोगप्रतिकारक प्रतिकार करणाऱ्या या पेशींकडून यास विरोध केला जातो आणि संक्रमित लिव्हर या पेशी नष्ट केल्या जातात यामुळे या रोगाची लक्षणे दिसतात जंतूचे संक्रमण झाल्यानंतर तर ताबडतोब दिसणाऱ्या लक्षणांना ‘अ◌ॅयटु हेपेटाइटिस बी’ पण असे म्हणतात.

त्यातील दोन तृतीयांश लोकांना काही त्रास होत नाही किंवा साधारण लक्षणे दिसतात याची बऱ्याचदा लक्षात येत नाही एक तृतीयांश रुग्णांना थकवा येणे, उलट्या, वरच्या भागात पोट दुखणे, कावीळ होणे (डोळे आणि लघवी) पिवळी होणे अशी लक्षणे दिसतात.यातील बरीचशी लक्षणे पंधरा ते तीस दिवसात कमी होतात आणि आपोआपच बरी होतात. दर शंभरातून एकाचे मात्र लिव्हर फेल होऊ शकते आणि आजार जीवघेणा ठरू शकतो. लक्षणे बरी झाली याचा अर्थ विषाणू संपला असे होत नाही. 95 टक्के लहान मुले आणि वृद्ध मध्ये हा विषाणू सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राहतो त्यास ‘क्रॉनिक हिपॅटायटिस बी’ असे म्हणतात. क्रोनिक हिपॅटायटिस बी झालेल्या रुग्णांमध्ये हा वायरस वर्षानुवर्षे अंदाजे 10 ते 40 वर्षे कोणतीही लक्षणे न दाखवता लिव्हर मध्ये वाढत राहतो. रोगप्रतिकार पेशींपासून लपून राहून हळू लिव्हर खराब करत राहतो.

लिव्हर पेशी जशा नष्ट होत जातात त्यांची जागा तंतुमय पदार्थ घेतात. लिव्हर लहान आणि विकृत होते त्यांची कार्यक्षमता कमी होते त्यालाच आपण सिरॉसिस म्हणतो.सिरॉसिस झालेल्या रुग्णांमध्ये पोटात पाणी होणे, रक्ताच्या उलट्या होणे, काळी संडास होणे कावीळ(डोळे आणि लघवी पिवळी) होणे पोट दुखणे ही लक्षणे दिसायला लागतात. सिरॉसिस आणि त्याची माहिती घेण्यासाठी मी पूर्वी लिहिलेल्या लेखाची लिंक शेवटी देत आहे.

या विषाणूची अभूतपूर्व क्षमता म्हणजे त्याचा डीएनए आपल्या लिव्हर पेशींच्या गुणसूत्रांमध्ये लपून बसतो आजार पूर्णपणे नष्ट केला तरी हा डीएनए नष्ट होत नाही त्यामुळे कोणत्याही कारणाने रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यास हा विषाणू परत जागृत होऊ शकतो तसेच क्रॉनिक हिपॅटायटिस बी लिव्हरचा कर्करोग होण्याची शक्यता सामान्य व्यक्तीपेक्षा चार पटीने वाढते.

हिपॅटायटिस बी कसा पसरतो?

तो भारतामध्ये एक तृतीयांश लोकांमध्ये हिपॅटायटिस बी चा संसर्ग गरोदरपणात संक्रमित आईकडून बाळाला होतो. सगळ्यात जास्त शक्यता आहे डिलिव्हरी करताना असते. दोन तृतीयांश संसर्ग हा इतर कारणांनी होतो जसे की संक्रमित केलेल्या रक्ताच्या किंवा रक्ताच्या घटकांचा वापर, असुरक्षित शारीरिक संबंध, संक्रमित रेझर वापरणे, टॅटू अंगावर बनवणे या किंवा इतर अशा कोणत्याही कारणांनी आजार पसरु शकतो. बहुतेक वेळी हा आजार आपल्याला कुठून झाला याची माहिती सापडतच नाही.

हिपॅटायटिस बी झाल्यास कोणत्या टेस्ट करतात?

या टेस्ट दोन प्रकारात मोडतात. पहिल्या प्रकारात हिपॅटायटिस बी या विषाणू संबंधाची सर्व माहिती घेतली जाते. यामध्ये विषाणूची शरीरातील मात्र जाण्यासाठी हायरल लोड विषाणूचा प्रसार त्या व्यक्ती पासून किती वेगात होऊ शकतो हे जाण्यासाठी HBeAg तपासण्या करणे आवश्यक असते. याशिवाय कधीकधी आजार अॅक्युट आहे की क्रॉनिक हे जाणण्यासाठी देखील काही तपासण्या केल्या जाऊ शकतात.

दुसऱ्या प्रकारात लिव्हरला झालेली इजा आणि त्याची मात्र याचा अभ्यास केला जातो. त्यासाठी लिवर फंक्शन टेस्ट, पोटाची सोनोग्राफी लिव्हरचा कडकपणा जाण्यासाठी फायब्रोस्कन यासारखे काही रिपोर्ट केले जातात. रिपोर्टमध्ये जर सिरॉसिस चे निदान होत असेल तर अजूनही काही चाचण्या केल्या जाऊ शकतात याची माहिती आपणास सिरॉसिस च्या लेखात मिळेल.

हिपॅटायटिस बी सोबतच एच आय व्ही किंवा हिपॅटायटिस सी आहे का हे देखील बघितले जाते. या विषयांमध्ये लिव्हरचा कर्करोग करण्याची विशेष क्षमता असल्यामुळे अशा रुग्णांची दर सहा महिन्याला अल्फा फिटो प्रोटीन (AFP) आणि पोटाची सोनोग्राफी केली जाते.

उपचार काय?

पूर्वी एकदा हिपॅटायटिस बी झाल्या झाला आला की तो जन्मभर राहतो असे म्हटले जायचे पण आता या विषाणू विरुद्ध एंटेकावीर, टीनोफोवीर नावाची प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. तरुण वयात संक्रमण झाल्यास 95 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये हा विषाणू विना उपचार नाहीसा होतो. या आजाराची ची ट्रीटमेंट कशी करावी यासाठी जगातील लिव्हर संबंधी अभ्यास करणार्‍या वेगवेगळ्या संस्थांनी आपली मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे.

वेळोवेळी येणाऱ्या अभ्यासानुसार ही तत्वे बदलत राहतात. विषाणूंचा संसर्ग कळल्याबरोबर प्रत्येकाला औषधे चालू करण्याची अनेक वर्षे गरज पडत नाही. लिव्हरला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसल्याने असे रुग्ण विना उपचार दर तीन महिन्यांनी डॉक्टरांना लिवर फंक्शन टेस्ट करून दाखवू शकतात. लिव्हरला कोणताही इजा झालेली नसताना औषधी चालू केल्यास विषाणू पुढे जाऊन औषधांना प्रतिसाद देत नाहीत तसेच ही औषधे अनेक वर्षे घ्यावी लागत घातल्यामुळे औषधांचा खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता असते. मात्र लिव्हरला कोणत्याही प्रकारची इजा होत असल्यास उपचार चालू करणे अतिशय आवश्यक असते तसेच रुग्णाच्या कोणत्याही नातेवाईकास हिपॅटायटिस बी मुळे लिव्हरचा कर्करोग झालेल्या झालेला असल्यास औषधे सुरू करावी लागतात.

उपलब्ध औषधे की विषाणू आपल्या शरीरात वाढू देत नाही त्याद्वारे राहिलेल्या विषाणूंना ठार करण्यास रोग प्रतिकारक पेशींना मदत करतात. औषधे एकदा चालू केल्यास अनेक वर्षे घ्यावी लागतात. HBsAg निगेटिव्ह करणे या उपचारांचा प्रमुख उद्देश आहे म्हणून एकदा चालू केलेले औषधे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थांबवून नयेत असे केल्यास विषाणू उफाळून वर येऊन लिव्हर फेल होण्याची शक्यता असते.

गरोदर पणात हिपॅटायटीस वि झाल्यास काय करावे

अशावेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घ्यावा. साधारणपणे गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात वायरल लोड जास्त असल्यास टीनोफोवीर हे गरोदर स्त्रीला चालणारे औषध सुरु करावे त्यामुळे बाळाला जंतूचे संक्रमण होण्याचा धोका खूपच कमी होतो. तसंच बाळ जन्माला आल्यानंतर त्याला लस आणि हेपेटायटिस बी इम्मुनो ग्लोबुलीन नावाचे औषध घेऊन जंतुसंसर्ग टाळता येतो.

आजारांपासून कसे वाचावे?

हिपॅटायटिस बी विषाणूचा संसर्ग आणि लिव्हरचा कर्करोग हे दोन्ही आजारांपासून बचाव केवळ साध्या लसीकरणाने आणि अतिशय स्वस्तात करता येतो. हिपॅटायटिस बी वरील लस पहिल्यांदा 1986 मध्ये बाजारात आली आणि 1992 मध्ये WHO ने सर्व देशांमध्येही लसीकरण सुरू केले 2007-08 पासून भारतामध्ये एक वर्षाच्या आतील सर्व बालकांना सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस पोलिओ सोबत मोफत देण्यात येते परंतु यापूर्वी जन्मलेल्या सर्व लोकांना ही लस घेणे अतिशय आवश्यक आहे त्यासाठी आपल्या घरात रुग्ण सापडण्याची वाट बघू नये. याचे तीन डोस आहेत.

पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा एक महिन्यांनी आणि तिसरा सहा महिन्यांनी घ्यावा. लस घेणाऱ्या लोकांपैकी 95 टक्के पेक्षा अधिक लोकांना या लसीचा चांगला परिणाम होतो. बूस्टर डोस घेण्याची घ्यायची गरज नसते त्यामुळे सर्वांनी ही लस घेतली नसल्यास किंवा अर्धवट घेतली
असल्यास सर्व डोस घ्यावेत ही विनंती.

लिवर सिरॉसिस म्हणजे काय ह्या लेखावरील लिंक पुढीलप्रमाणे आहे

Blog

डॉ. विनीत कहाळेकर
MBBS, MD, DM Gastroenterology (KEM, Mumbai)
लिव्हर विकार, पोट विकार आणि एंडोस्कोपी तज्ञ
निरामय लिव्हर व गॅस्ट्रो क्लिनिक आणि एंडोस्कोपी सेंटर, समर्थ नगर औरंगाबाद
युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद
मोबाईल नं . ७४९९७०८६३६

लिव्हर (यकृत) खराब होतंय? लिव्हर सिरॉसिस म्हणजे काय? ( भाग 1)

वाचकहो नमस्कार! आजकालच्या जीवनात लिव्हरचे आजार खूप कॉमन झाले आहेत. एखादा रुग्ण कावीळ पोटात पाणी पायावर सूज असा त्रास देऊन डॉक्टरांकडे गेला की त्याला लिव्हर खराब आहे असे सांगण्यात येते. तर लिवर खराब होणे म्हणजेच सिरॉसिस होणे म्हणजे काय आणि त्याची काय कारणे आहेत त्यासाठी काय करावे याची कारणमिमांसा आपण या लेखात करणार आहोत.

लिव्हरचे शरीरातील कार्य
लिव्हर हा शरीरातील एक सर्वात मोठा अवयव आहे. एखाद्या प्रौढ पुरुषांमध्ये त्याचे वजन साधारणपणे दीड किलोपर्यंत असते. पोर्टल व्हेन नावाची रक्तवाहिनी छोट्या आतडे (small intestine), मोठे आतडे(large intestine), पांथरी (spleen) यांच्याकडून रक्त गोळा करून लिव्हरला रक्तपुरवठा करते. हे रक्त लिव्हरमध्ये अन्नघटक शोषल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया होऊन हृदयाकडे पाठवले जाते. हे सर्व कार्य लिव्हरमधील वेगवेगळ्या पेशी करतात.

लिव्हर खराब होते म्हणजे काय?
आपल्या जीवनातील काही गोष्टी या लिव्हर साठी खूप घातक आहेत, उदाहरणार्थ, मद्यपान, लिव्हरला इजा पोहोचवणारे काही विशिष्ट वायरस (हेपेटाइटिस बी व सी), डायबेटिस, स्थूलता, पेन किलर चे अतिसेवन (NSAIDs), लिव्हरला इजा पोहोचवणाऱ्या औषधींचे दीर्घकाळ सेवन, शरीरामध्ये जन्मजात असलेले जनुकीय आजार या आणि अशा इतर अनेक गोष्टी लिव्हर मधील पेशींना दीर्घकाळ त्रास देत असतात. हा काळा अनेक वर्षांचा असतो. वरील कोणत्याही त्रासामुळे लिव्हर मधील पेशी हळूहळू नष्ट व्हायला लागतात. एका मर्यादेच्या वर ही इजा पोहोचल्यास लिव्हर मधील नष्ट होणाऱ्या पेशींची जागा तंतुमय घटक (fibrous bands) घ्यायला लागतात. अजून तरी ही मर्यादा ओळखणे वैद्यकीय विज्ञानाला शक्य झालेले नाही. आपल्या शरीरावरील जखम बरी होते त्यावेळी ती आकुंचन पावते आणि तंतुमय घटकांमुळे तिथे एक व्रण तयार होतो. लिव्हर मध्ये देखील असेच होते. लिव्हर मधील काम करणाऱ्या पेशी कमी होत जातात , लिव्हर आकुंचन पावते आणि कडक होते. जोपर्यंत 90% लिव्हरला इजा होत नाही तोपर्यंत शक्यतो लक्षणे दिसून येत नाहीत.

लिव्हर सिरोसिस ची लक्षणे काय?
सिरॉसिस कोणत्याही कारणामुळे झाला तरी लक्षणे सारखीच दिसतात. कावीळ म्हणजे डोळे पिवळे होणे, लघवी पिवळी होणे शरीर पिवळे पडणे हे सिरॉसिसचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. लिव्हरला होणारा आघात जोरात असल्यास कावीळ दिसून येतो. परंतु जर आघात हळू हळू होत असेल, तर अनेक रुग्णांमध्ये कावीळ न होता देखील सिरॉसीस होऊ शकतो. खूप थकवा येणे, भूक न लागणे, अचानक वजन कमी होऊ लागणे ही सिरॉसिसची प्राथमिक लक्षणे आहेत. पोटात पाणी होऊन पोट फुगणे, पायावर सूज येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, हात व पाय बारीक होऊन पोटाचा घेर वाढणे सिरॉसिसच्या पुढच्या स्टेजची काही लक्षणे आहेत. तसेच रक्ताच्या उलट्या होणे काळी संडास होणे या गोष्टी दिसून येतात.
सिरॉसिसच्या शेवटच्या स्टेजमध्ये इतर अवयवांवर देखील परिणाम दिसून येतात. शरीरात अमोनिया जास्त झाल्यामुळे मेंदूला सूज येते. अशावेळी झोप कमी जास्त होण्यापासून ते बेशुद्ध होणे तसेच कोमात जाण्यापर्यंत लक्षणे दिसून येतात. किडनीला होणारा रक्तपुरवठा कमी होऊन किडणीला इजा होते.
हृदयाची आकुंचन पावण्याची क्षमता कमी होऊ शकते. फुफ्फुसांचे ऑक्सिजन शोषण्याची क्षमता कमी होऊ शकते. यातील कोणत्याही अवयवांवरील परिणामांमुळे आयुष्य खूप कमी होऊन जाते.

पुढील लेखामध्ये आपण लिव्हर सिरॉसिस च्या प्रमुख कारणांची थोडी माहिती, लागणाऱ्या तपासण्या आणि प्रमुख उपचार यांची माहिती घेऊया.
धन्यवाद.

डॉ. विनीत कहाळेकर
MBBS, MD, DM Gastroenterology (KEM, Mumbai)
लिव्हर विकार, पोट विकार आणि एंडोस्कोपी तज्ञ
निरामय लिव्हर व गॅस्ट्रो क्लिनिक आणि एंडोस्कोपी सेंटर, समर्थ नगर औरंगाबाद
युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद
मोबाईल नं . ७४९९७०८६३६

पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो?

पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो?
पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो? बद्धकोष्ठता म्हणजे काय?

वाचकहो नमस्कार. आपण मागील दोन लेखात अॅसिडिटी संबंधित आजारांचा अभ्यास केला. या लेखात देखील आपण आपल्या जीवनशैलीशी संबंधित एका लक्षणाविषयी जाणून घेऊया ती म्हणजे बद्धकोष्ठता. हा रिफाइंड वस्तूंचा जमाना आहे. खाण्याचे तेल, पीठ या वस्तू रिफाइंड येतात. बेकरीतील मैद्याचे पदार्थ, हॉटेल मधील देखील मैदयाचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. यांत्रिकीकरणामुळे शरीराचे चलनवलन कमी झाले आणि स्थुलता वाढली. या सर्वांमुळे पोट साफ न होण्याचे प्रमाण वाढले. पर्यायाने बद्धकोष्ठता वाढली. साधारणपणे जगातील 30 टक्के लोकांना याचा त्रास होतो.

बद्धकोष्ठता कशाला म्हणतात? पोट साफ न होणे हे बद्धकोष्ठतेचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहे. तसेच शौचास जास्त वेळ बसावे लागणे, शौचास जास्त जोर दयावा लागणे, संडास दगडासारखी कडक होणे, पोट साफ न झाल्यामळे वारंवार शौचास जावे लागणे किवा अनेक दिवस शौचास न होणे ही सर्व बद्धकोष्टतेची लक्षण आहेत. काही लोकांना संडास खाली। अडकल्यासारखे वाटणे आणि बोटाने काढावी लागणे असा देखील त्रास होतो. वरीलपैकी साधारणपणे दोन लक्षणे जरी आपणास त्रास देत असतील तर बदधकोष्ठता आहे असे समजावे. महिलांमध्ये बद्धकोष्ठता अधिक प्रमाणात आढळून येते. तसेच वाढते वय, अशिक्षितपणा, कमी शारीरिक हालचाल, स्थूलता, काही प्रकारच्या औषधांच्या सेवनाने बद्धकोष्ठता वाढीस लागते. त्यामध्ये पॅरासिटामोल, अॅस्पिरिन, कॅल्शियम आणि लोह वाढवणारी औषधे, अॅल्युमिनियम असणारी अॅसिडिटीची औषधे, काही पेन-किलर्स यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.

साधारण शरीर रचना आणि कार्य आपल्या शरीरात विष्ठा तयार करण्याचे काम मोठे आतडे करते. लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात येणारे एक ते दीड लिटर पाणी मोठे आतडे शोषून घेते. पचनानंतर उरलेला अन्नाचा चोथा व शंभर ते दोनशे मिली पाणी त्यापासून मोठे आतडे विष्ठा तयार करते. विष्ठा शरीराच्या बाहेर टाकने हे मोठे आतडे, त्याच्या नसा (नर्व), शरीरातील खालच्या भागातील स्नायू आणि गुदद्वाराच्या ठिकाणी असलेला स्नायूंचा व्हॉल्व यांचे सांघिक कार्य आहे. जेव्हा विष्ठा मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागात येते (रेक्टम), तेव्हा आतड्याचा शेवटचा भाग विष्ठा । गुददवारातून बाहेर ढकलतो. पोटाच्या खालच्या भागातील स्नायू त्यावेळी मोठ्या आतड्याला विष्ठा ढकलण्यास मदत करतात. गुददवाराच्या ठिकाणी असलेला स्नायूंचा व्हॉल्व, (जो एरवी विष्ठा रोखून धरण्यास मदत करतो)

तो ढिला झाला की विष्ठा शरीराबाहेर पडते. या शरीर कार्यामध्ये कुठेही अडथळा आल्यास बद्धकोष्ठता होते.

प्रकार

बद्धकोष्ठतेचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे शरीरातील इतर कोणत्या आजारांमुळे किंवा मोठ्या आतड्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यामुळे होणारी बद्धकोष्ठता म्हणजेच सेकंडरी कॉन्स्टिपेशन. डायबेटिस, थायरॉईडचे आजार, पक्षाघात, पाठीच्या मणक्याला होणारी इजा, औषधांचा वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या आतड्याचा कर्करोग ही सेकंडरी कॉन्स्टिपेशन ची काही महत्त्वाची कारणे आहेत. हल्ली सुरू झालेल्या त्रासांमध्ये ही कारणे शोधणे आवश्यक असते. दुसरा प्रकार म्हणजे याचे कोणतेही कारण सापडत नाही असा म्हणजेच फंक्शनल कॉन्स्टिपेशन. यामध्ये प्रामुख्याने आतड्याची गती मंदावल्याने बद्धकोष्टता होते किंवा गुदद्वाराचा स्नायूंचा व्हॉल्व ढिला होत नसल्याने त्रास होतो. त्यास डीफिकेटरी डिसॉर्डर म्हणतात. हा त्रास रुग्णांना अनेक वर्षे त्रास देतो.

सहन करत राहिल्यास होणारे परिणाम

बद्धकोष्ठता सहन करत राहिल्यास पाईल्स (मूळव्याध) म्हणजेच संडासमध्ये वेदनारहित रक्तस्त्राव होणे, फिशर म्हणजेच संडासमध्ये वेदने सोबत रक्तस्त्राव होणे, संडासच्या जागेवर कोंब येणे असे त्रास होतात. बोटाने विष्ठा काढण्याच्या सवय असेल तर आतड्यास इजा होऊन अल्सर होतात, आणि त्यातून रक्तस्त्राव होतो. कामामध्ये मन न लागणे, सतत पोट भरलेले वाटणे, नैराश्य येणे ही पुढची लक्षणे होत.

उपचार

बद्धकोष्ठतेसाठी असंख्य प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. परंतु जीवनशैलीत बदल न केल्यास त्रास वारंवार होत राहतो. उपचारासाठी कारण जाणणे आवश्यक असते. आपणास असा त्रास होत असल्यास जवळच्या पोट विकार तज्ञांना जरूर दाखवावे.

___डॉक्टर आपल्या शुगर, थायरॉईड अशा रक्ताच्या प्राथमिक तपासणी करून घेतील. कोणतेही कारण सापडत नसल्यास किंवा कर्करोगाची शक्यता वाटत असली, तर कोलोनोस्कोपी करू शकतात. कोलोनोस्कोपी मध्ये संपूर्ण मोठ्या आतड्याची दुर्बिणीदवारे तपासणी करता येते. कर्करोगाची गाठ सापडल्यास बायोप्सी घेऊन तिचे निदान। करता येते. छोटी गाठ असल्यास संपूर्णपणे काढता देखील येते. भूक न लागणे, वजन कमी होणे, संडास मध्ये रक्त येणे किंवा वय 50 पेक्षा अधिक असल्यास आणि बद्धकोष्ठता हल्लीच सुरू झाल्यास कोलोनोस्कोपी लवकरात लवकर करून घ्यावी.

बद्धकोष्ठतेसाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे वेगवेगळ्या प्रकारच्या बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी लागू पडतात. कधीकधी एकापेक्षा अधिक औषधे एकाच रुग्णामध्ये वापरावी लागतात. अधिक तर रुग्णांमध्ये ही औषधे बराच काळ द्यावी लागतात. त्यामुळे त्यांचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत. जीवन शैलीतील बदल हा प्रमुख्याने करावा तर अशी औषधे ही कमीत कमी लागतात किवा अशी जीवनशैली सातत्याने पाळल्यास औषधे बंद देखील होतात. बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी भरपूर पाणी प्यावे. रोज किमान 30 ते 40 मिनिटे बराबर पायी चालावे. यामुळे आतड्यांची साफ होण्याची गती सुधारते. सकाळी पोटभर नाश्ता करण्याची सवय करावी. आहारात फायबर युक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे. फायबर आपल्या शरीरात शोषले जात नाहीत ते पाणी धरून ठेवून विष्ठा बनवण्यास मोठ्या आतड्यास सहाय्य करतात. आहारातून मैदयाचे पदार्थ पूर्णपणे बंद करावीत. शौचास जाण्याची इच्छा झाल्यास लगेच जावे अडवून ठेवू नये. शक्यतो भारतीय संडासचा वापर करावा. तसे करणे शक्य नसल्यास वेस्टन कमोड वर बसताना पायाखाली किमान सहा इंचाचा स्टूल ठेवावा. ही सर्व जीवनशैली पाळल्यास बराच फरक पडू शकतो

वरील सर्व करून काहीही फरक न पडल्यास अनोरेक्टल मॅनोमेत्री हा तपास करून डीफिकेटरी डिसॉर्डर आहे का हे पहावे. असा त्रास असल्यास रुग्णांना पोटाच्या खालच्या भागातील स्नायूचे व्यायाम करावे लागतात. औषधांनी फारसा फरक पडत नाही.

डॉ. विनीत कहाळेकर

एम डी, डी एम गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (के ई एम रुग्णालय मुंबई)

निरामय लिव्हर गॅस्ट्रो क्लीनिक, समर्थ नगर, औरंगाबाद

यूनाइटेड सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद फोन नंबर ७४९९७०८६३६